पुरातन काळापासून सोळा शिवलिंगांचे अस्तित्व लाभलेली पवित्र भूमी म्हणजे सोळशी. हरळीचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भव्य टेकडीच्या पायथ्याशी वसलेले श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान, सोळशी आज हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या देवस्थानाचा कारभार श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, सोळशी यांच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सेवाभावी पद्धतीने चालविला जात आहे.
भाविकांच्या सहकार्याने गेल्या २५ वर्षांत देवस्थान परिसरात क्रमाक्रमाने अनेक सोई-सुविधा उभ्या राहिल्या—
दररोज सुमारे २५ किलो अन्नदान
दर शनिवारी सुमारे २५ क्विंटल अन्नदान
स्वयंपाकगृह, पाण्याच्या टाक्या
अन्नछत्रासाठी बैठक व्यवस्था
प्रवचन व धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठा सभामंडप
ट्रस्ट कार्यालय, निवास व्यवस्था
स्वच्छतागृह, वीज व पाणी सुविधा
भाविकांनी गरजेनुसार व कुवतीनुसार अन्नसामग्री, सेवा आणि दानातून या देवस्थानाच्या आजच्या स्वरूपाला आकार दिला आहे.
भविष्यातील गरजांचा विचार करून काही भाविकांनी जमीनदान करून विकासासाठी पुढाकार घेतला आहे.
संन्यासी वृत्तीचे, शिवभक्त असलेले परमपूज्य त्यागेश्वर (त्यागी) महाराज यांचे मूळ नाव श्री नामधारी चिंतामणी शिंदे होते. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी त्यांनी घरदाराचा त्याग करून सोळशी भूमीत आपले आयुष्य समर्पित केले.
सुखसाधनांपासून अलिप्त राहून, सात्त्विक जीवन, भक्तिभाव आणि सहज प्रबोधनातून त्यागी महाराजांनी गावकऱ्यांना अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवला. देहत्यागापूर्वी त्यांनी “या भूमीत माझा उत्तराधिकारी येईल आणि सत्य, धर्म व नीतीचे बीज पेरले जाईल” अशी भविष्यवाणी ग्रामस्थांना सांगितली होती. १५ सप्टेंबर १९९६ रोजी त्यागी महाराजांनी देहत्याग केला.
उपजीविकेच्या शोधात एक साधा मजूर म्हणून परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराज या भूमीत आले. रोजचा कष्टाचा संसार, शिवोपासना आणि त्यागी महाराजांनी सुरू केलेल्या शनैश्वर उपासनेतून गावकऱ्यांच्या लक्षात आले की हेच त्या गुरुवचनातील उत्तराधिकारी आहेत.
त्यागी महाराजांच्या कार्याला सुयोग्य दिशा, शिस्त आणि सातत्य मिळावे यासाठी नंदगिरी महाराजांनी श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. नियम, नियोजन आणि पारदर्शकतेच्या बळावर देवस्थानाची वाटचाल सुरू झाली.
देवस्थान ट्रस्टचा उद्देश केवळ अध्यात्मिक कार्यापुरता मर्यादित नाही. “श्रद्धेतून संस्कार, संस्कारातून विचार आणि विचारातून सशक्त समाजनिर्मिती” या तत्वावर आधारित विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
☑️हुंडामुक्त सामुदायिक विवाह सोहळे
☑️मोफत वैद्यकीय व आरोग्य शिबिरे
☑️मोफत शालेय साहित्य वाटप
☑️व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन
☑️रक्तदान शिबिरे
☑️गरजू मुलांचे संगोपन
☑️कोरोना काळातही अन्नधान्य, औषधे, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मानवतेची सेवा करण्यात आली.
समाजात स्त्रीविषयी आदरभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने —
➡️महिलांसाठी श्रावण आनंदोत्सव
➡️जेष्ठ मातांसाठी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा असे उपक्रम राबविले गेले.
भक्ती, परंपरा आणि संस्कारांचा वारसा
देवस्थानात शनीदेवांची उपासना केंद्रस्थानी असून सत्य, शिस्त आणि कर्मनिष्ठेचे तत्त्व भाविकांपर्यंत पोहोचवले जाते.
शनीजयंती, शनी अमावस्या, शनी जन्मोत्सव, त्यागेश्वर महाराज पालखी सोहळा, अभिषेक, होमहवन, त्रिकाल महाआरती, सत्संग, पारायण अशा विविध धार्मिक परंपरा अखंड सुरू आहेत.
राज्यस्तरीय साहित्य संमेलन, काव्य संमेलन, संस्कार शिबिरे आणि समाजातील उल्लेखनीय व्यक्तींना “शनैश्वर कृतज्ञता पुरस्कार” देऊन सन्मानित करण्याची परंपराही देवस्थान जपत आहे.
देवस्थान ट्रस्टच्या पारदर्शक, शिस्तबद्ध व समाजोपयोगी कारभाराची दखल घेत राजकीय, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती येथे आवर्जून भेट देतात.
सध्या देवस्थानाला महाराष्ट्र शासनाचा तिर्थक्षेत्र “ब-वर्ग” व शासनमान्य वनपर्यटन दर्जा प्राप्त झाला असून शासकीय सहकार्याने पुढील विकासकार्य सुरू आहे.भाविक म्हणून या पवित्र कार्यात आपलाही सहभाग महत्त्वाचा आहे. विश्वास, गुणवत्ता आणि सेवाभावाचे प्रतीक
श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान, सोळशी येथे देणगी देणाऱ्या भाविकांना आयकर कायद्यानुसार कलम 80G अंतर्गत विशेष करसूट मिळते.
देवस्थानास NS-EN ISO 9001 : 2008 / ISO 9001 : 2008 हे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त असून पारदर्शक प्रशासन, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि सेवाभाव याचे हे प्रतीक आहे.
स्वच्छ व सुंदर परिसर, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि विनम्र व सेवाभावी सेवेकरी यांमुळे शनैश्वर देवस्थान भाविकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे आणि सेवेमध्ये अग्रगण्य स्थान मिळवत आहे.