शनी रहस्य

filler image

शनीदेव सुर्यपुत्र आहेत. ते धर्मप्रिय, सत्यप्रिय आहेत. असत्य वागणाऱ्याला ते त्रस्त करतात. म्हणून तर असे म्हणतात –

शनीदेवासारखा रडविणारा कोणी नाही.

शनीदेवासारखा हसविणारा कोणी नाही

शनीदेवासारखा राजा बनविणारा कोणी नाही.

शनीदेवासारखा रंक/भिकारी बनविणारा कोणी नाही.

लोहार लोखंड भट्टीत तापवून त्यावर घाव घालून त्याला हवा तो आकार देतो तसेच शनीदेव व्यसन, व्याभिचार, अंधश्रद्धा आणि अहितकारी गोष्टी करणाऱ्याला अनेक यातना देतात अनेक प्रकारे तावून सुलाखून घडवितात.

शनिदेव ही तेहत्तीस कोटी देवांमधली सर्वाधिक दरारा असणारी देवता आहे. शनीची साडेसाती म्हटले की भल्याभल्यांचा थरकाप उडतो. शनीची वक्रदृष्टी ज्याच्यावर पडली त्याची खैर नसते असे म्हणतात. केवळ माणसेच नव्हे तर अगदी देवांची देखील या साडेसातीपासून सुटका नाही. त्यामुळेच सर्व देवदेवता देखील शनीमहाराजांना घाबरत असल्याचे दाखले पुराणात सापडतात. भारतात शनीची तीन रुपे मानतात.


शनी पौराणिक देवता

पौराणिक दृष्टीकोनातून शनी ही शक्तीशाली देवता आहे. नवग्रहांपैकी हा एक पाप ग्रह मानला जातो. मस्त्यपुराणानुसार यालाच शनैश्वर म्हणतात. तो लोखंडापासून बनलेल्या रथात विराजमान असून संपूर्ण ग्रहमंडळाची परिक्रमा तो ३० महिन्यात पुर्ण करतो. भागवत पुराणात वर्णन केल्याप्रमाणे ग्रहमंडळात शनीचे स्थान बृहस्पतीच्यावर दोन योजांनावर आहे. तो मंदगती असल्याने प्रत्येक राशीत तो तीस-तीस महिने चालत असतो आणि तीस वर्षांनी बारा राशी भोगतो. हा ग्रह सर्वांनाच अशुभकारक असतो. पौराणिक साहित्यात त्याला महातेजस्वी, तीक्ष्ण व कठोर स्वभावाचा ग्रह म्हटले आहे. खगोल शास्त्रानुसार शनी देवता

कलिका पुराणाच्या १८व्या अध्यायात देवांनी शनैश्वराची स्तुती केल्याचे दाखले मिळतात. यात केलेल्या वर्णनानुसार दक्ष कन्या सातीने शिवाशी विवाह केला. पुढे दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात आमंत्रित न केल्याला सतीने जाब विचारण्याच्या हेतूने यज्ञस्थळी भेट दिली. मात्र तिथे तिला अपानित करण्यात आले. तेव्हा अपमानित सतीने यज्ञकुंडातच देहत्याग केला. तिच्या मृत्युने शिवाला खूप शोक झाला. शिवाच्या शोकाश्रुंनी पृथ्वी नष्ट होऊ नये म्हणून सर्व देवतांनी शनैश्वराची स्तुती केली व त्या आश्रूंना थोपवून धरण्यास सांगितले. त्या आश्रूंना सावरत असतांना शनीचा वर्ण कृष्ण झाला.

स्कंद पुराणाच्या प्रभास खंडामध्ये ४९व्या अध्यायात शिव-पार्वती संवादातून शनी महात्म्य समोर येते. त्यानुसार शनीने शिवलिंगाची पूजा करून ग्रह मंडळात महत्वाचे स्थान मिळवल्याचे समजते. शिव पार्वतीला सांगतात, पृथ्वीतलावर शनिला न भिणारा एकही जीवप्राणी सापडणार नाही. आपल्या जीवनात शनीने प्रवेश करू नये म्हणून मनुष्याने शनीचे स्मरण करून शमीच्या पानाच्या वजनाइतके काळे तीळ ब्राह्मणाला दान दिले किंवा काळे उडीद अथा गुल दिला तरी शनी प्रसन्न होतो.

मत्स्यपुराणातील ९३व्या अध्यायात सुख-शांती-कल्याणासाठी नवग्रहांचा यज्ञ करण्यास सांगितले आहे. या यज्ञात शनीला अहुती देतांना ‘शंनो देवीरभिष्ट्ये’ या मंत्राचा उच्चार करून आहुती दिल्यास शनी सर्व पीडा दूर करतो असे सांगितले आहे.


शनी कथा

परंपरेने सांगितली जाणारी शनीकथा काशी खंडात वाचायला मिळते. ती अशी,

श्री शनैश्वरच्या वडिलांचे नाव सूर्यदेव व आईचे नाव संज्ञा होय. संज्ञा ही ब्रम्हदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती याची कन्या. दक्षाने आपल्या कन्येचे लग्न सूर्याशी करून दिले. मात्र सूर्यदेवाचे प्रखर तेज संज्ञा सहन करू शकत नव्हती. तिला वाटत होते की, मी स्वताच तपश्चर्या करून तेज वाढवावे म्हणजे सूर्याचे तेज सुसह्य होईल. सूर्य आणि संज्ञा यांना सहा अपत्ये झाली पैकी १) यमराज २) शनीदेव आणि पुत्रींमध्ये भद्रा, कालिंदी, तपती व सावित्री.

संज्ञेचे आपल्या मुलांवर खूप प्रेम होते मात्र सूर्याचे तेज सहन होत नसल्याने एके दिवशी संज्ञाने विचार केला की आपण माहेरी जाऊन तिथे तपश्चर्या करू अन् तिथेही विरोध झाला तर दूर कुठे तरी एकतांत जाऊन तपश्चर्या करू. जाण्याआधी तिने आपल्या सारख्याच दिसणाऱ्या एका छायेची निर्मीती केली जिचे नाव सुवर्णा ठेवले.

सुवर्णाला आपल्या मुलांची जबाबदारी सोपवताना संज्ञा म्हणाली, " सुवर्णा आजपासून माझ्या ऐवजी तू नारी धर्म संभाळ, अन् माझ्या मुलाबाळांचे पालन पोषण तू स्वतः कर. हे करताना जर काही अडचण आली, तर मला बोलव, मी लगेच येईन, पण एक गोष्ट लक्षात ठेव तू सुवर्णा आहेस संज्ञा नाहीस हे रहस्य कुणालाही कळता कामा नये."

संज्ञा माहेरी निघून आल्यावर वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. हे ऐकताच वडिलांनी संज्ञाला रागवून फटकारले व तू लगेच आपल्या सासरी सूर्याजवळ जा असे सांगतले. संज्ञा विचार करायला लागली, जर मी परतले तर सारे रहस्य बाहेर येणार. शेवटी ती निब्बिड वनात जो उत्तर कुरुक्षेत्र आहे तिथे गेली. तिने "बडवा घोडी" रूप धारण केले जेणेकरून तिला कुणी ओळखणार नाही. मग ती तपश्र्चर्याला लागली.

इकडे सूर्य व छाया/सुवर्णाला पाच मुले व तीन मुली झाली. पती पत्नी एकमेकाबरोबर खूप प्रेम करीत. त्यामुळे सूर्याला शंकेचे कारणच नव्हते. मात्र एकदा प्रसंग असा आला की, शनीदेवांना भुक लागलेली होती. त्यांनी आईकडे जेवण मागितले. देवधर्म झाल्यावर जेवण देते असे सांगताच शनीदेवाला राग आला. राग आणि भुकेच्या भरात त्यांनी आईला लाथ मारली. त्याक्षणी सुवर्णानी त्याला शाप दिला, “माझ्यावर उगारलेला पाय तुटून तू लंगडा होशील.” शनीने घडलेला प्रकार वडीलांना सांगताच त्यांना आश्चर्य वाटले. आई मुलाला शाप देणे शक्यच नाही असा विचार करून सुवर्णा ही संज्ञा नाही हे सत्य समोर आले. मात्र वडील या नात्याने आईच्या शापाची तीव्रता कमी करण्याचे ठरवून त्यांनी शनीस सांगितले, तुझा पाय तुटणार नाही मात्र त्यात व्यंग असेल.तेव्हापासून शनीदेव अपंग आहेत.

श्री शनिदेवाची निर्मीती महर्षी कश्यपच्या यज्ञातून झाली. जेव्हा शनि छाया/सुवर्णाच्या गर्भात होता तेव्हा शिव भक्त सुवर्णाने शिवाची इतकी तपश्चर्या केली की, ती आपले खाणे-पिणे सुद्धा विसरून जात असे. तिच्या अशा तपर्श्चर्येमुळे गर्भातच शनीचा रंग काळा झाला. शनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा काळा रंग पाहून सूर्यदेव हैराण झाले. सुर्याला सुवर्णाची शंका आली व सुवर्णाचा अपमान करीत सांगितले की हा मुलगा माझा नाही.

श्री शनिदेवाच्या अंगात जन्मतः आईच्या तपश्चर्येच्या शक्तीचे बळ होते. वडील आईचा अपमान करीत आहेत हे पाहून त्यांनी क्रूर नजरेने पित्याकडे पाहिले. शनीने पाहताच त्यांच्या वडिलांच्या शरीराचा रंग सुद्धा काळा झाला. घोडे चालण्याचे थांबले, रथ पुढे चालू शकला नाही

हैराण झालेल्या सूर्यदेवाने शिवाची आराधना सुरु केली, तेव्हा शिवाने सुर्याला सल्ला दिला की, तुमच्या कडून मुलगा व स्त्री दोघांचाही अपमान झाला. यामुळे दोष लागला. लगेच मग सूर्यदेवाने माफी मागितली. परिणामी पुन्हा सूर्यदेवाला सुंदर रूप प्राप्त झाले, व घोडे चालायला लागले. तेव्हापासून श्री शनिदेव वडिलांचे विद्रोही, शिवचे भक्त व माता यांना प्रिय आहे.


शनी ग्रह

शनीचे ग्रह म्हणून असणारे अस्तित्व दोन प्रकारे मानले जाते (१) सुर्य मंडळातील शनी ग्रह (२) ज्योतिष शास्त्रानुसार शनी ग्रह

सुर्य मंडळातील शनी ग्रह

सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी (Saturn) हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर व गुरू नंतरचा सर्वात मोठा ग्रह आहे. ह्याचा आकार देखिल प्रचंड आहे. शनी ग्रह आकाराने प्रचंड असला तरी याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, म्हणजे जर शनी पाण्यात पडला तरी तो त्या पाण्यावर सहज तरंगेल. शनीचा व्यास साधारणतः १, २०, ५३७ कि. मी. इतका आहे.

तो शनी ग्रह त्याच्याभोवती असलेल्या कड्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे. शनी ग्रहाभोवती असणाऱ्या असंख्य लहान मोठ्या खडकांनी मिळून कडी निर्माण झाली आहेत. अतिशय कमी तापमानामुळे या कड्यांतील सर्व तुकडे बर्फाच्छादित आहेत. शनी ग्रह त्याच्या अक्षाभोवती साधारणत: २८ अंशांनी कललेला असलेल्यामुळे पृथ्वीवरून आपणास शनीची कडी व्यवस्थित दिसतात.

गुरू ग्रहाप्रमाणेच हा ग्रह देखिल वायूने बनलेला आहे. स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास या ग्रहाला साधारणतः १० तास लागतात व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास २९ वर्ष लागतात. सूर्यापासून हा ग्रह जवळपास १, ४२६, ७२५, ४०० कि. मी. ( 9.53707031 A.U.) अंतरावर आहे. शनीला अनेक उपग्रह आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार शनी ग्रह

शनीचे सूर्यमालेतील ग्रह म्हणून अस्तित्व असले तरी भारतीय ज्योतिष शास्त्रात तेजपुंज आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे. ज्योतिष शास्त्रात शनीला अशुभ मानले जाते. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या माणसाची जी (चंद्र)रास असेल त्या राशीत किंवा तिच्या आधीच्या किंवा पुढच्या राशीत जेव्हा शनी असतो, तेव्हा ता माणसाला साडेसाती आहे असे समजले जाते.

शनिची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या ९५ पट अधिक असल्यामुळे आपल्या मनात जो काही विचार येतो, ज्या कल्पना, योजना आखतो त्याची माहिती चांगली अथवा वाईट चुंबकीय शक्तीने शानिपर्यंत पोहचते. फलस्वरूप चांगल्याचा चांगला परिणाम तर वाईटाचा वाईट परिणाम लगेचच दिसून येतो. वाईट प्रभावाला फलज्योतिष मध्ये अशुभ मानलेले आहे, तर चांगल्याचा परिणाम शुभ मानला आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शनीचे प्रभुत्व आपल्यावर आहे. आपल्या शरीरात लोह तत्वाचा स्वामी शनि आहे. शनि कमजोर, दुर्लब झाल्यास शनीचा प्रकोप, शनिची पिडा होते. लोह तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात.

आकाशातील अन्य तारकांच्या संदर्भातील शनीचा वेग अतिशय कमी आहे. म्हणजे अडीच वर्षांमध्ये शनी फक्त एक रास (३० अंश) पुढे जातो. त्यामुळे शनीला संस्कृतमध्ये ’मंद’ म्हणतात.

संपर्क

Telephone:9765186929, 8275371395
Email: info@shanidevsolshi.org, avinashlembhe2012@gmail.com
Website: www.shanidevsolashi.org

श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान, सोळशी.

ता. कोरेगाव, जि. सातारा -४१५५१७

महाराष्ट्र